नागालँड चे मित्र बनूया...

>> Friday, August 10, 2012

                              आधी जाऊन आल्याने मनात घर करून बसलेला ईशान्य भारत पुन्हा अनुभवता येणार म्हणून किंवा नागालँडला प्रथमच जायला मिळणार म्हणून उत्सुक असणाऱ्या अनेकांपैकी आठ जणांचा गट जाण्यासाठी तयार झाला. विज्ञान कार्यशाळा हे या दौऱ्याचं निमित्तं..... त्यासाठी प्रयोग, संकल्पना, त्याचं साहित्य इ. तयारीबरोबरच वाचन, चर्चा इ. वैचारिक तयारी ओघानंच आली. तिकडे जाण्याआधी डोक्यात अखंडपणे नागालॅंड होतं...तसंच होतं आणि किंबहुना ते व्हायलाच हवं... पूर्वांचल पहाणं त्याहीपेक्षा तो अनुभवणं ही आयुष्यातील अनमोल ठेव असते आणि आता ती आमच्याकडे आहे यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.
                                          २०१० साली अरूणाचल दौरा झाल्यानंतर सुरू झालेल्या युरेका या विज्ञान मासिकाद्वारे तिथे तयार झालेली ओळख, पोषक वातावरण या पार्श्वभूमीमुळे २०१२ नागालॅंड चा विज्ञान कार्यशाळेचा दौरा आखण्यात आला. एकूण दहा दिवसांच्या या दौऱ्यात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी आठ जणांच्या गटाने कार्यशाळा घेतल्या. दिमापूर येथील जनजाती विकास समिती (कल्याण आश्रमाच्या) कार्यकर्यांनी ह्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन केले.


                                         नागालॅंडच्या मुलांच्या मनातील असणारी भिती कमी करण्यासाठी "SCIENCE IS EASY AND FRIENDLY" ही संकल्पना घेऊन आमचे दोन गट विविध भागांमध्ये गेले. एक गट व्हिल्सेमा, तेसुफेनियो, मोखुक्चुंग असा केदारजींबरोबर तर दुसरा गट तेनिंग, ओल्ड टेसन, जालुकी असा साहजी व दामतुईजींबरोबर गेला. दोन्ही प्रांतात जाण्याची कारणे वेगवेगळी होती. तेनिंगकडील भागात आता जनजाती विकास समितीचे कार्य पसरले असून सर्वांनी स्विकारले आहे. तर कोणीही जात नसलेल्या मोखुक्चुंगकडील भागात वाचनालयाच्या प्रयोगानी झालेल्या सुरुवातीनंतर आता प्रथमच काही नवीन उपक्रम घेऊन ओळख प्रस्थापित करणे ही गरज आहे. प्रमुख व म्होरक्या जमातींचे अनुकरण इतर जमाती करत असल्याने या उपक्रमाला त्यांनी स्विकारणे हे महत्वाचे आहे. त्यामुळेच या प्रांतात ह्या उपक्रमाला आगळे महत्व होते.
                                        व्हिल्सेमातील रिंगमा, तेसुफेनियोतील अंगामी व मोखुक्चुंगमधील आओ अशा तीन गावातील जनजातींच्या लोकांना भेटण्याची संधी एका गटाला मिळाली. नागलॅडमधील प्रमुख व म्होरक्या जमाती ह्या भागात असून संपूर्ण धर्मांतरण झालेला हा भाग आहे. त्यांच्या जमातींचे वेगळेपण जपत, त्यांना एकत्र न येऊ देता मिशनऱ्यांनी त्यांच्यावरील अंमल कायम ठेवलेला आहे. आणि म्हणूनच जमात वेगवेगळी असली तरिही धर्म एकच.....!!! युरोप, अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात निधी येत असल्याने मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा पुरविण्याच्या निमित्ताने मिशनऱ्यांनी येथे पाय रोवले. धर्मांतरण घडवून आणणे हे खूप अवघड होते; पण ध्येय नेमके व सुस्पष्ट असल्याने तब्बल ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पहिला माणूस धर्मांतरित झाला. आज 2012 साली जवळ जवळ 99% नागालँड क्रिश्चन आहे. या काळात आणि अजुनही भारतातील कोणीच इकडे पोहोचले नसल्याचे शल्य मनाला लागून रहातं. त्यांच्या संस्कृतीचा नियोजनपूर्वक व संयम ठेवून चिकाटीने केलेला नाश याला नकळतपणे आपण जबाबदार आहोत का असा प्रश्न मनाला पडतो. इतक्या सुंदर प्रदेशाचं मूळ चित्रं त्यांनी संपूर्णपणे पालटलं; पण तरीही आशा न सोडता त्यांच्या मजबूत पायाखालची जमीन हालविण्याचं काम जनजाती विकास समिती खूप वेगळ्या प्रकारे करत आहे हे पाहून मनाला उभारी येते. आणि म्हणूनच नागालॅंडचे वकील बनून जा, इथल्या समस्यांपेक्षा इथल्या चांगल्या गोष्टी, लोकं, अनुभव, निसर्ग हे इतरांपर्यंत पोहोचवा. थोडक्यात चांगला नागालॅंड पोहोचवा हे त्यांनी सांगितलेलं सूत्रं आम्हीदेखील लक्षात ठेवलंय.

                                                   विज्ञानाला बाजूला ठेवून यांची संस्कृती मुळापासून तोडली आणि नेमका विज्ञानाचा हाच मुद्दा समिती आता प्रामुख्याने पुढे आणत आहे. आज महाराष्ट्रात आपला इतिहास आपल्याला माहित आहे , आपली संस्कृती आपण जपून आहोत पण नागालँड मध्ये मिशनरीज नी त्यांची संस्कृती "सैतानी " आहे असं बिम्बवून संपवून टाकली आहे. " १००% ख्रिश्चन= १००% सुधारणा, साक्षरता असे समीकरण तयार झालेल्या प्रांतातील अनुभव फरच वेगळा होता. तेनिंगच्या गटाला ’हराक्का’ या एका जमातीच्या वेगवेगळ्या प्रांतात जाण्याची संधी मिळाली. हराक्का हे स्वधर्मी (हिंदू) नागा... जे जनजाती विकास समितीच्या प्रदीर्घ व अथक प्रयत्नांमुळे धर्मांतरणापासून बचावले आहेत. सध्या नागालॅंडमध्ये (२५ लाख लोकसंख्येपैकी) केवळ ३०००-४००० स्वधर्मी लोक शिल्लक राहिले आहेत. कल्याण आश्रमाचे काम, त्यांनी घडविलेले कार्यकर्ते, त्यांचे समर्पण आणि कार्याचा आवाका हा वाखाणण्याजोगा असून तो अनुभवल्याशिवाय समजणे अवघडच!!!! तेथील लोकांचा स्वधर्म टिकावा, समृद्ध असलेली संस्कृती जोपासली जावी यासाठीच्या प्रयत्नांची फळे ठळकपणे जाणवली. मुख्यतः हराक्काच्या सबलीकरणासाठी, उभारलेल्या कामाच्या मजबूतीसाठी आणि इतरंप्रमाणेच हराक्कासुद्धा स्वतःचा विकास करू शकतात ही जाणीव तेथील समाजाला करून देण्यासाठी विज्ञान कार्यशाळा हे निमित्त होते.

                                                     विज्ञान कार्यशाळा घेण्याबरोबरच दोन्ही गटांच्या काही खास व्यक्तींशी भेटी, गप्पा झाल्या. गुवाहटीत श्री. जगदंब मल, श्री. रमथङग, तेनिंगमध्ये मेजर आनंद जोशी तर मोखुक्चुंगमध्ये श्री. विक्रम खराटे (आई. पी. एस.) यांच्या भेटी विशेष ठरल्या. याबरोबरच ठिकठिकाणचे उत्साही कार्यकर्ते व शिक्षक, घराघरांमधील प्रेमळ व आगत्यशील लोक यांच्या भेटी, सहवास हा एक सुंदर अनुभव होता. सर्व शिबिरे झाल्यावर एक गट कोहिमा दर्शनासाठी गेला. तेथील वॉर मेमोरिअल, नागा हेरिटेज व्हिलेज, दुसऱ्या महायुद्धातील जिथल्या तिथे तसाच असणारा रणगाडा ही काही .......... ठिकाणं. त्यानंतर दिमापूरमध्ये एकत्र आले व त्यानंतर सगळे शिलॉंगसाठी रवाना झालो. नागालॅंडमधून मेघालयात जाताना हवेत, सभोवतालच्या वातावरणात, लोकांत लगेच फरक जाणवायला लागला. शिलॉंग पीक, एलेफंटा फॉल्स, प्राणीसंग्रहालय ही तेथील सुंदर ठिकाणं. मेघालयात खूपच आल्हाददायक, प्रसन्न वाटत होतं.
                                        "एकदा ब्रह्मपुत्र ओलांडला की सात वेळा इकडे यावं लागतं" या तिकडच्या नुकत्याच कळलेल्या म्हणीमुळे चेरापुंजी, काझीरंगा पहाता न आल्याची आमची रुखरुख कमी झाली आणि परत येऊ असा सर्वांना विश्वास वाटला. धर्मांतरण सुरू असूनही स्वधर्मीपणा टिकवू पहाणारे हराक्का आणि मूळ ओळख, संस्कृती मुळापासून नष्ट झाली आहे असे धर्मांतरित ख्रिश्चन असे दोन्हीही समाजगटांची झलक पहाता आली. दौऱ्यादरम्यान पडलेले प्रश्न, मिळालेले अनुभव, मदतीची गरज यांबद्दल सर्वांच्याच डोक्यात विचार सुरु झाले आहेत. या दौऱ्याचे अनुभवकथन तर आहेच; पण ते ऐकून फक्त हळहळून किंवा आठवणीत रमून जाणे पुरेसे नाही.
नागालँड हां भारताचा अविभाज्य भाग आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही..आज कश्मीर म्हंटल की सर्वाचं रक्त सळ सळ करू लागतं..नागालँड ची परिस्थिती तर याहून वाईट आहे. 1962 सालापासून हां भाग आपल्या स्वतंत्र देशाची मागणी करत आहे आणि मिशनरिज ना जगभरातून मिळनाय्रा प्रचंड निधीतून त्याला ख़त पाणी मिळत आहे . आज आपण काही हालचाल केली नाही तर नागालँड वेगळा होन्यावाचून राहणार नाही.
                                           'युरेका' मासिकाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती पोहोचवून एकमेकांना ओळखू या आणि या चळवळीत सामील होऊ या. शेवटी एवढेच मनाशी ठरवू की, अंतराने लांब आणि संपूर्णतः वेगळा असणारा नागालंड  जवळ आणण्यासाठी, तो जाणून घेण्यासाठी मासिक, विज्ञान शिबिरे, मैत्री-अभ्यास दौरे यांच्याद्वारे आपण सर्वजण शक्य ती मदत करू.


                                       नागालँड  भौगोलिक रीत्या आपल्यापासून बराच दूर असून आपल्यातले बरेच मराठी कार्यकर्ते तेथिल विषम वातावरणात  मन लाऊन , घाम गळून काम करतात..आपण तिकडे जाऊन काही काम करू शकत नसलो तरी तेथील उपक्रमांना आर्थिक मदत देऊ शकतो. नागलॅण्ड दौरा झाल्यानंतर ग्रंथालयासाठी आम्ही इकडून मदत पाठवत असतो . आपल्या गड , किल्ले , इतिहास याचे ओळख या मार्गाने तिथल्या मुल्लांना होते आणि बाहेरच्या जगात काय आहे याचीही माहिती मिळते.एकूणच मोठ्या आर्थिक मदतीची गरज तिथे आहे.
                                           येत्या दिवाळी दरम्यान कल्याण आश्रमाने एका मोठ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विध्यार्थ्याना Science Presentations देणे , आपली संस्कृती समजावणे , आपला इतिहास सांगणे , शिबीर घेणे अशी कामे त्यात असतील . यासाठी आपल्याला 1 Laptop ची सोय करायची असून, तो लवकरात लवकर तिकडे पोहोचवायचा आहे , तरी या कामात तुम्हाला काही मदत करायची असल्यास आथवा वर्गणी द्यावयाची असल्यास जरूर मला संपर्क साधा.  माझा भ्रमणध्वनी नं: 9822525662 असून आपण मला दिवसभरात कधीही संपर्क करू शकता .

                                     विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे भारतमाता हेच दैवत मानून तिची सेवा करू आणि विवेकानंदांनी पाहिलेले ’अखंड भारताचे’ स्वप्न स्वतः आपणही पाहून पूर्णत्वास नेऊ.


Stumble Upon Toolbar

2 प्रतिक्रीया:

BAIJUBASANT August 11, 2012 at 5:58 AM  

Really reading all blogs myself highly impressed. Your efforts are valuableto unite India.

My hertly wishes for this work,
AHIRE B. K.
NASHIK

Digamber August 12, 2012 at 11:10 PM  

Ekdam mast,

नागालँड बद्दल माहिती वाचून खूप आनंद झाला
मी ५-६ दिवस कार्य शाळे मध्ये मदद म्हणून उपस्तीथ राहू शकतो.

digamber@changeindia.com

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP