आश्रम
>> Sunday, February 12, 2017
आश्रम
थकलेल्या श्वासांचा गाव
काका , मामा , आजी , मावशी
हाकेपुरते नुसते नाव..
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
नावानिशी ओळख ना उरली ,
पत-प्रतिष्ठा वाया ठरली
मुले विसरली अस्तित्व
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
डोळयांमधली आस संपली
रागाची ठिणगीही विझली
उरला ना कुठलाही भाव
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
गात्रे हतबल झिजलेली
काया व्याधींनी क्षीणली
भय मृत्यूचे घेते ठाव
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
कुणा वाटते स्वरात भिजवू
कुणी वाचनी बघते रिझवू
नुसते मलम ना मिटती घाव
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
आश्रम हा परिसर झकास
अंत:करण तरीही भकास
ओठी जरी देवाचं नाव
थकलेल्या श्वासांचा गाव ।।
सदर कविता माझी आत्या शैलजा रमेश किंकर हिने अखिल भारतीय साहित्य संमेलन , डोंबिवली येथे ५ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर केलेली आहे.