पुणे ग्रँड टूर २०२६: गुळगुळीत रस्ते आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा एक प्रयोग
>> Friday, January 23, 2026
पुणे ग्रँड टूर २०२६: गुळगुळीत रस्ते आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा एक प्रयोग
बऱ्याच वर्षांनंतर ब्लॉग पोस्ट लिहितोय... कारणही तसेच आहे. कालच झालेली 'पुणे ग्रँड टूर २०२६' - अभूतपूर्व नियोजन, तयारी, गुळगुळीत रस्ते, परदेशी पाहुणे आणि पुणेकरांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद!
यामध्ये पुणे प्रशासन, पोलीस आणि वाहतूक विभाग हे समन्वयाने काम करू शकतात असे दिसले, पण मला विशेष कौतुक वाटले ते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे. एखाद्या IAS अधिकाऱ्याने ठरवले तर तो संपूर्ण यंत्रणा कामाला लावू शकतो, याचे जिवंत उदाहरण पुणे आणि परिसराने ३-४ दिवसांत बघितले.
पुणे आणि परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, अतिक्रमण, नगरसेवक-आमदार-दादा-आण्णा-भाऊ यांचे कामामध्ये नाक खुपसणे, बेसिक सुविधांचा अभाव आणि पोलिसांची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली बदनामी... हा काहीसा कमी झालेला विश्वास परत मिळवण्यासाठी, सायकल स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने वेळेचे 'टार्गेट' ठेऊन काम करण्यासाठी मागच्या वर्षी या स्पर्धेचा घाट घातला गेला. त्यासाठी किती तयारी झाली असेल, किती 'प्रेसेंटेशन' आणि बैठका झडल्या असतील, वरिष्ठ पातळीवर लोकांना कसे 'Convince' केले असेल, हे त्यांचं त्यांनाच माहित! त्यात लांबलेला पावसाळा आणि हातात असलेले जेमतेम ३-४ महिने, शिवाय निवडणुकीची कामे आणि दैनंदिन जबाबदाऱ्या... हे सर्व सांभाळून, जर ठरवले तर एकत्र मिळून यंत्रणा काम करू शकते, हे या स्पर्धेवरून प्रशासनाला आणि लोकांनाही दिसून आले.
गिरीवनकडे जाणारा कोळवण रस्ता कित्येक वर्षांपासून इतका खराब होता की तिथे पोहचायला दीड तास लागायचा. आणि आता? तो रस्ता चक्क इंटरनॅशनल स्टँडर्डचा झाला आहे. कितीतरी रस्ते असे चकाचक केले गेले... मुद्दा हा आहे की ते करू शकतात... फक्त त्यासाठी इच्छाशक्ती आणि मागे डुडींसारखा एखादा अधिकारी लागतो किंवा नवल किशोर राम यांच्यासारखा आयुक्त लागतो.
त्यात अजून एक भाग असा की यामध्ये फक्त "पुणे" केंद्रभागी होते, न की कोणतीही "पार्टी", ना अण्णा, दादा, भाऊ, मोदींचे पोस्टर ना त्यांची जाहिरात. मागच्या वर्षी मोहोळांनी SP कॉलेज ग्राउंडवर ड्रोन शो आयोजित केला होता, तो छान झाला, पण तो म्हणजे अण्णा मोहोळांची आणि मोदींची जाहिरातच होती. आजही आपण आजूबाजूला बघितले तर बेंच असो, लाइट पोल किंवा कचरा कुंडी... तिथे स्थानिक नगरसेवकाचे किंवा होतकरू पुढार्याचे "सौजन्याने" नाव लिहिलेले असतेच - हुंड्यामध्ये मिळालेल्या गोदरेज कपाटासारखे!
कलमाडी कर्तेधर्ते असताना 'पुणे फेस्टिव्हल' मोठ्या दिमाखात साजरा व्हायचा, पण ते बाजूला झाल्यावर पुणे फेस्टिव्हलची हवा कमी झाली, कारण तो एक राजकीय किंवा त्या माणसाने चालवलेला उपक्रम होता, त्यात प्रशासन किती involved होतं माहित नाही. पण "सिटी पुणे" म्हणून प्रशासन राजकीय मदतीशिवाय एखादा उपक्रम राबवू शकते, असा थोडा का होईना विश्वास यामुळे तयार झाला. (संभाजी बागेतली किल्ला स्पर्धा अजूनही तितक्याच उत्साहात आजू सुरु आहे, हे याचेच उदाहरण).
अर्थात, या सगळ्या कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरी बाजूही दुर्लक्षित करून चालणार नाही. या 'ग्रँड' इव्हेंटसाठी जे रस्ते चकाचक झाले, ते सोडले तर शहराच्या आतल्या भागातील खड्ड्यांचे काय? प्रशासनाची ही तत्परता फक्त 'इव्हेंट' पुरतीच मर्यादित राहणार की सामान्य पुणेकरांच्या रोजच्या नशिबी आलेले खड्डेही बुजवले जाणार? शिवाय, स्पर्धेच्या दिवशी वाहतूक वळवल्यामुळे अनेक ठिकाणी जो गोंधळ उडाला आणि सामान्य नोकरदारांना जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याचे नियोजन अधिक चांगले होऊ शकले असते. 'विकास' हा फक्त स्पर्धेच्या मार्गावर न होता तो सर्वसमावेशक असावा, नाहीतर हा 'मेकओव्हर' म्हणजे केवळ 'चार दिवसांचे चांदणे' ठरेल.
तरीही, पुणे पोर्शे प्रकरणानंतर आणि रोजच कोयते घेऊन फिरणाऱ्या लोकल गुंडांमुळे पुणे पोलिसांवर 'झोपल्याचे' आरोप होत असतात. या निमित्ताने त्यांनाही जरा आपली 'इमेज' सुधरवण्याची (Image Makeover) संधी मिळाली, हे नक्की.
शेवटी, या स्पर्धेने एक गोष्ट मात्र नक्की साध्य केली - पुणेकरांना दाखवून दिले की आपले शहरही 'जागतिक दर्जाचे' दिसू शकते. प्रश्न फक्त सातत्याचा आहे. सायकलिंगची ही 'टूर' संपली असली तरी विकासाची ही गती अशीच कायम राहावी. नाहीतर, मंडप उतरला की वऱ्हाड परतले आणि गाव पुन्हा सुने... असे व्हायला नको. ही स्पर्धा एक 'इव्हेंट' न ठरता प्रशासकीय इच्छाशक्तीचे एक 'मॉडेल' ठरावे, हीच एक पुणेकर म्हणून माफक अपेक्षा!
तुम्हाला काय वाटते? पुण्याच्या विकासाचे हे 'मॉडेल' टिकेल की रस्ते पुन्हा पहिल्या पावसात वाहून जातील? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.
#PuneGrandTour2026 #PuneInfrastructure #PuneRoads #SmartCityPune #PuneCyclists #PuneAdministration #JitendraDudi #PuneTraffic #Development #PuneCity

2 प्रतिक्रीया:
विकासाचा आलेख हा थोडा फार वर-खाली होतच राहील.
इच्छ्या शक्ती असल्यास काय होऊ शकते याचे चांगले उदाहरण आहे.
Their is always scope for improvement असे म्हणून सातत्याने असे प्रयोग होणे गरजेचे आहे.
Post a Comment